Share this
अंढेरा(नंदकिशोर देशमुख:बुलडाणा कव्हरेज न्यूज): देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा पोलीसस्टेशन अंतर्गत असलेल्या शिवणी आरमाळ येथील शेतकरी कैलास नागरे यांनी कीटकनाशक प्राशन करून आज ऐन होळीच्या दिवशी आपली जीवनयात्रा संपवली.
आत्महत्या करण्यापूर्वी कैलास नागरे यांनी लिहिलेली ह्रदय पिळवून टाकणारी ४ पानांची सुसाईड नोट प्राप्त झाली आहे. या सुसाईड नोट मध्ये कैलास नागरेंनी आत्महत्या करण्याचे कारण अगदी स्पष्ट लिहिली आहे.
या पूर्वी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना बारमाही पाणी मिळावे यासाठी कैलास नागरे यांनी लढा उभारला होता. आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतही कैलास नागरेंनी शेतीसाठी पाणी द्या अशी मागणी केली आहे..
याशिवाय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आमदार खासदारांनाही त्यांनी आवाहन केले आहे.
त्यांचा पाण्यासाठीचा संघर्ष खूप जुना आहे. तो तात्काळ मार्गी लावा, आमच्या पंचक्रोशीत जर बारमाही पाणी आले तर शेतकरी भरकटणार नाही असेही कैलास नागरे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोट मध्ये नमूद केले आहे.
आमच्याकडे सिंचनाच्या सर्व सुविधा आहेत, फक्त शेतीला हमी पाणी नाही, म्हणून शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये सातत्य राहत नाही, त्यांचा आर्थिक समतोल बिघडतो आणि कर्जबाजारी होतो अन् वैफल्यग्रस्त होऊन तो नैराश्येच्या गर्तेत जातो. त्याला जगणे असह्य होते असेही कैलास नागरे यांनी लिहिले आहे. या सुसाईड नोट मध्ये कैलास नागरे यांनी शेतीच्या वादाचाही उल्लेख केला आहे. गावकऱ्यांनी हा वाद आपसात बसून सोडवावा असेही त्यांनी लिहिले आहे.
शेतीच्या उत्पादनात सातत्य नसल्याने मी भरकटलो. संसाराचा गाडा, शेतीचा गाडा, कोर्टकचेरी, मुलांचे शिक्षण, सुखदुःख करण्यासाठी मी असमर्थ ठरलो.. मी स्वतः शून्य झालो, मागेही शून्य सोडून चाललो, मुलं, बाबा, बहिणी, भाऊजी, बायको यांनाही शून्य करूनच जातोय.. माझ्या बाबांच्या भाषेत हे प्रारब्धाचे भोग आहेत, ते सर्वांनाच भोगावे लागणार असेही स्व. कैलास नागरे यांनी लिहिले आहे..
मुख्यमंत्र्यासह उपमुख्यमंत्री,आमदार,खासदारांला केले आव्हान….
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, खासदार, आमदार यांनी आमच्या मुलांचे पालकत्व स्वीकारावे व वादग्रस्त शेतीचा वाद मिटवावा असेही कैलास नागरे यांनी लिहिले आहे.