Share this
चिखली (बुलडाणा कव्हरेज बातमी): बीड जिल्ह्यातील
मस्साजोग गावातील सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या निघृण हत्येच्या निषेधार्थ चिखली शहरात आज दिनांक 11 मार्च रोजी कडकडीत बंद पुकारण्यात आला आहे. या बंदला चिखलीतील सर्वपक्षीय राजकीय नेते, व्यापारी, अडत , सामाजिक संघटना, बाजार समिती आणि नागरिकांनी मोठा पाठिंबा दिला. बंद शंभर टक्के यशस्वी ठरत असून, शांततेत आणि एकजुटीने नागरिकांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला आहे.

सकाळी चिखली बसस्टँड परिसरातील कामाक्षी रेस्टॉरंटजवळ मोठ्या संख्येने नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेते एकत्र आले. या वेळी स्वर्गीय संतोष देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. उपस्थितांनी दोषींना फाशीची कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. “ही केवळ हत्या नाही, तर समाजाला हादरवणारा अमानुष कृत्य आहे,” असे संयोजकांनी सांगितले. यावेळी तहसीलदार यांच्यामार्फत माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात पुढील प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या
स्व. संतोष देशमुख यांच्या हत्येतील सर्व आरोपींना फाशीची कठोर शिक्षा देण्यात यावी.
• गुन्ह्याच्या कटात सहभागी असल्याचा संशय असलेल्या मुख्य आरोपी धनंजय मुंडे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात यावा.
आरोपींच्या सर्व मालमत्ता जप्त करण्यात याव्यात.
• या प्रकरणात हलगर्जीपणा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी.
• बीड जिल्ह्यात गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी स्वतंत्र IPS दर्जाचा पोलीस अधिकारी नेमण्यात यावा.
शहरातील सर्व दुकाने, बाजारपेठा, औद्योगिक प्रतिष्ठाने, आणि वाहतूक संपूर्णतः बंद आहे. व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवत आंदोलनाला सक्रिय पाठिंबा दिला. बंद शांततेत पार पडत असून पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून चिखलीतील नागरिकांनी शासनाकडे दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
“हे फक्त आंदोलन नाही, तर अन्यायाविरुद्धचा बुलंद आवाज आहे,” असे नागरिकांनी स्पष्ट केले. स्व. संतोष देशमुख यांना श्रद्धांजली वाहत आणि त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी नागरिकांनी आपली एकजूट दाखवली. “आपली एकजूटच न्याय मिळवून देईल,” या निर्धाराने बंद यशस्वी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.